Posted by: vmbhonde | नोव्हेंबर 13, 2011

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व Bookmark and Share
Share this on Rediff.com
Print E-mail
डॉ. संजय ओक , रविवार, २४ ऑक्टोबर २०१०
sanjayoak@kem.edu 

माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला. आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे! आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत.. दोन बालपणांत. आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.
चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता? चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप  पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.
पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा. 
या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला. एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या  अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो. 
साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव. सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’
..चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

 

 

suhas patil” <surapasaa@gmail.com     30-10-2010

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: